लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीला बाळापूर पोलिसांनी १० जुलै रोजी रात्री १ वाजता जेरबंद केले. गेल्या दहा दिवसांपासून ही टोळी दुचाकीवर येऊन ट्रक चालकांना लुटत होती. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर एक आरोपी पसार झाला आहे. चारही आरोपींना बाळापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्गावर रात्री प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांना अकोल्यातील काहीजण दुचाकीने येऊन लुटत होते. हा प्रकार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू होता. पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून ट्रक चालकांनी या घटनेची तक्रार करीत नव्हते. एका चालकाने सोमवारी ही बाब बाळापूर पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या टोळीवर पाळत ठेवली. सोमवारी रात्री या टोळीने एका ट्रक चालकाकडून ६,५०० रुपये लुटले. त्यानंतर आणखी एका वाहनाला अडविण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी राहुल विनोद सारवान (२५), रोहन कैलास डिकाव (२०), बलराम रामसिंग डिकाव (२०) रा. वाल्मीकी नगर अकोला, कुणाल मनोज निदाने (२५) शिवाजी नगर अकोला यांना अटक केली. याप्रकरणी रणजित महेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेतील अन्य एक आरोपी पसार झाला आहे. ही कारवाई ठाणेदार एफ.सी. मिर्झा यांच्या मार्गदर्शनात बाळापूर पोलिसांनी केली.
ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद
By admin | Published: July 11, 2017 8:19 PM