संतोष येलकर /अकोला: जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेली १ कोटी २० लाख रुपयांची दुधाळ जनावरे वाटपाची योजना जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या तांत्रिक मंजुरीअभावी अडकली आहे. त्यामुळे या योजनेला जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची तांत्रिक मंजुरी केव्हा मिळणार, याकडे जिल्ह्यातील लाभार्थींचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद सेस फंडातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून दुधाळ जनावरे वाटप करण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींचे अर्ज जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झाले; मात्र दुधाळ जनावरे वाटप योजनेला आवश्यक असलेली जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची तांत्रिक मंजुरी अद्याप मिळाली नाही. तांत्रिक मंजुरीअभावी या योजनेच्या लाभार्थींची निवड करण्याची प्रक्रियादेखील रखडली आहे. त्यामुळे तांत्रिक मंजुरीअभावी अडकलेल्या ''समाजकल्याण''च्या दुधाळ जनावरे वाटप योजनेला जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची तांत्रिक मंजुरी केव्हा मिळणार, याकडे जिल्ह्यातील लाभार्थीचे लक्ष लागले आहे.
१० डिसेंबरला सर्वसाधारण सभा;
तांत्रिक मंजुरी मिळणार?
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण ऑनलाइन सभा १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेला मंजुरी मिळणार की नाही, याकडे आता जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
१०,३३३ अर्ज प्राप्त;
लाभार्थींची निवड रखडली!
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाकडे १० हजार ३३३ लाभार्थीं अर्ज प्राप्त झाले; परंतु योजनेला तांत्रिक मंजुरी नसल्याने प्राप्त अर्जामधून लाभार्थींची निवड अद्याप होऊ शकली नाही.
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत लाभार्थींची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
-आर.एस. वसतकार
समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद