ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात सन २0१४-१५ मध्ये १ लाख ३४ हजार ९६५ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या १५ हजार ५२५ कामे सूरू असून, या कामांवर १ लाख १६ हजार ८७६ मजुरांची उपस्थिती आहे. रोहयोतून राज्यातील लाखो मजुरांच्या हाताला काम मिळाले असून, त्यांच्या मजुरीतही यावर्षी १३ रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून सुरू झालेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, पूरनियंत्रण, जलसंधारण व जलसंवर्धन, दुष्काळ प्रतिबंधक, लघुसिंचन, जमिनीच्या विकासाकरीता सिंचनाची कामे, पारंपरिक जलस्त्रोतांचे नूतनीकरण, भूविकास, राजीव गांधी सेवा केंद्र, ग्रामीण पेयजल, ग्रामीण स्वच्छता अभियान आदी कामे केली जातात. २0१३-१४ या वर्षात ७८ हजार ८0७ कामे पूर्ण करण्यात आली होती, तर २0१४-१५ मध्ये सुमारे १९ हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायत क्षेत्रात या योजनेतंतर्गत कामे करण्यात आली. ११ लाख ६0 हजार कुटुंबातील एकूण २१ लाख ५६ हजार मजुरांनी यावर्षात १ लाख ३४ हजार ९६५ कामे पूर्ण केली. २0१४-१५ या वर्षातील एकूण कामांपैकी सर्वात जास्त ग्रामीण स्वच्छता अभियानांतर्गत ८७ हजार २५७ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर जमिनीच्या विकासाकरीता सिंचनाची १६ हजार ३५८, जलसंधारण व जलसंवर्धनाची १३ हजार २१७ कामे, दुष्काळ प्रतिबंधक ७ हजार ६८१, तर ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची ३ हजार ११ कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. सध्या १५ हजार ५२५ कामे सूरू असून, या कामांवर १ लाख १६ हजार ८७६ मजुरांची उपस्थिती आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २00५ मधील कलम ६ नुसार प्रत्येक वर्षी मजुरी दर निश्चित करण्यात येतात. २0१४-१५ मध्ये मजुरीचा दर १६८ रुपये होता. यावर्षी २0१५-१६ मध्ये १८१ रुपये दर ठेवण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या मजुरांची मजुरी त्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये जमा केली जाते. २0१३-१४ अखेरपर्यंत ४६ लाख ७0 हजार, तर सन २0१४-१५ या वर्षअखेरपर्यंत ४७ लाख ५६ हजार मजुरांची खाती उघडण्यात आली आहेत.
*महिलांचा ४३ टक्के सहभाग
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत महिला व पुरूषांमध्ये भेदभाव न ठेवता समान मजुरीचे दर ठेवण्यात आले आहेत. योजनेमध्ये महिलांचा किमान ३३ टक्के सहभाग असणे गरजेचे आहे. योजनेंतर्गत राज्यामध्ये निर्माण झालेल्या एकूण मजुरांमध्ये सन २0१३-१४ या वर्षात ४३.६९ टक्के महिलांचा सहभाग होता. २0१४-१५ या वर्षात ४३.४७ टक्के महिलांचा सहभाग होता.
*एकाच महिन्यात २४ हजार मजुरांमध्ये वाढ
राज्यात मजुरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ऑगस्ट २0१५ पर्यंत १२ हजार ६४६ कामे सुरू होती. या कामांवर ९२ हजार ९0८ मजुरांची उपस्थिती होती. एकाच महिन्यात मजुरांची संख्या २४ हजाराने वाढली आहे. सध्या राज्यात १५ हजार ५२५ कामे सूरू असून, या कामांवर १ लाख १६ हजार ८७६ मजुरांची उपस्थिती आहे.