अकोला, दि. २९-दुबईत चांगल्या नोकरीचे आमिष देऊन एका युवकाला तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. या प्रकरणाची तक्रार शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्याकडे केली आहे.ताजनापेठ परिसरातील आसीफ खान गुलाम हुसेन मन्सुरी यांना अकोट फैलातील रहिवासी शेख सलीम आणि त्याचा साथीदार शेख खालीद या दोघांनी दुबईत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. आसीफ खान गुलाम हुसेन मन्सुरी हा या दोघांच्या आमिषाला बळी पडताच या दोघांनी त्याला पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी १ लाख ३५ हजार रुपयांची मागणी केली. युवकानेही त्यांना १ लाख ३५ हजार रुपये दिले; मात्र त्यानंतर या दोघांनी त्याला दुबईला पाठविण्यास असर्मथता दर्शविली, सदर युवकाने विचारणा केली असता त्याची टाळाटाळ सुरू केली.व पैसे देण्यासही नकार दिला. अखेर युवकाने या प्रकरणाची तक्रार शहर पोलीस उपअधीक्षक माने पाटील यांच्याकडे केली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दुबईत नोकरीचे आमिष देऊन सव्वा लाखाने गंडविले!
By admin | Published: October 30, 2016 3:22 AM