- सदानंद सिरसाट अकोला : शेतकर्यांचा नॉन एफएक्यू उडीद घेण्यास अकोट खरेदी केंद्राने नकार दिल्यानंतर तो उडीद व्यापार्यांनी घेतला. त्यानंतर तोच उडीद व्यापार्यांनी खरेदी केंद्रावर आणल्याने केंद्रातील संबंधित कर्मचार्यांनी खरेदी केला. व्यापार्यांकडून खरेदी केलेल्या त्या नॉन एफएक्यू दर्जाच्या खरेदीमुळे नाफेड, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनला २0 लाखांचा फटका बसला आहे. याप्रकरणी संबंधितांची जबाबदारी निश्चित होणार आहे. खरेदी केलेला ४२८ क्विंटल उडीद नॉन एफएक्यू असल्याने एकूण साठय़ात त्याची तूट दाखवण्यात येत आहे.शेतकर्यांची लूट थांबवण्यासाठी शासनाने हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी प्रक्रिया ३ ऑक्टोबरपासून सुरू केली. त्यासाठी जिल्हय़ात मूग, उडीद खरेदीसाठी नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या चार केंद्रांवर सोय केली. त्या ठिकाणी तालुका खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी अकोट केंद्रात ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा मूग, उडीद नॉन एफएक्यू असल्याचे कारण देत नाकारण्यात आला. शेतकर्यांना केंद्रात नाकारलेला माल परत न्यावा लागतो. केंद्रातील ग्रेडर्सनी नाकारलेला उडीद शेतकर्यांनी खासगी व्यापार्यांना विकला. त्यावेळी व्यापार्यांनी त्यांच्याकडून सात-बाराच्या प्रतीही घेतल्या. त्या आधारे व्यापार्यांनी खरेदी केंद्रात आधीच नाकारलेला तोच उडीद केंद्रात विक्री केला. अकोट खविसंने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचा साठा करण्यासाठी अकोला येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात पाठवला. त्या ठिकाणी ग्रेडर्सनी ४२८ क्विंटल उडीद एफएक्यू दर्जाचा नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांना कळवले. त्यानुसार उडीद अकोट केंद्रात परत पाठवण्यात आला. सोबतच जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांनी अकोट खरेदी-विक्री केंद्रातील संबंधित ग्रेडर्सना कारणे दाखवा नोटीसही बजावली. त्यानंतर प्रतवारी सुधारून उडीद पुन्हा साठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
पुंडकर यांनी केली तक्रारदरम्यान, खराब उडिदाचा साठा करण्याच्या हालचाली सुरू असतानाच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी सहकार मंत्र्यासह सर्व संबंधितांकडे तक्रारी केल्या. याप्रकरणी नॉन एफएक्यू ४२८ क्विंटल उडिदाची खरेदी करणार्या संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवारी सुरू झाली आहे. संबंधितांवर लवकरच कारवाई होणार आहे.
सरव्यवस्थापक कानडे देणार उद्या भेटनाफेडच्या वतीने उडीद खरेदी करणार्या महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक के.जी. कानडे मंगळवारी अकोल्यात दाखल झाले. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील विविध विषयांसह अकोट खरेदी केंद्रातील या प्रकाराचा अहवाल ते वरिष्ठांना सादर करणार असल्याची माहिती आहे.
‘लोकमत’ने मांडले होते वास्तवलोकमतने ९ डिसेंबर रोजीच वृत्त प्रसिद्ध करत व्यापार्यांकडून नॉन एफएक्यू उडीद खरेदी केल्याचे वास्तव मांडले होते. त्यामुळे हा खराब उडीद राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील साठय़ातून बाहेर ठेवण्यात आला. त्यामुळे अकोट केंद्रात खरेदी झालेल्या १९00 क्विंटल साठय़ापैकी ४२८ क्विंटल नॉन एफएक्यू उडीद खराब असल्याने तो साठय़ातून वगळण्यात आला.-