लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव (पु.म.) पासून १ कि.मी. अंतरावरील सांजापूर शे तशिवारातील रोडच्या खाली एका खड्डय़ात शेतीला लागणारा उपयोगी असा कृषी मालाचा लाखो रुपये किमतीचा माल बेवारस स्थितीत आढळून आला आहे. हा माल कोणाच्या मालकीचा आहे व तो कुणी आणून उघड्यावर बेवारस फेकला, या विषयी सध्या येथे चर्चेला उधाण आले आहे.मूर्तिजापूर तालुक्यात येणार्या सांजापूर शेत शिवारातील रेल्वे गेटपासून शंभर फूट अंतरावर असलेल्या एका हरभर्याच्या शेताजवळ खड्डय़ात लाखो रुपये किमतीची मुदतबाह्य ठरलेली कीटकनाशके व खते मोठय़ा प्रमाणात फेकून दिल्याचे आढळून आले आहे. या कीटकनाशके व खतांमध्ये सार्थक कंपनीचे बोरान, सल्फर ९0 टक्के, मेटाडॉन, खताची पाकिटे, सार्थक क्रॉप टॉनिक, रोगजंतू सापळे (चाळणी), लेबल नसलेल्या एक लीटरच्या केमिकल बॉटल आणि इतर साठा मोठय़ा प्रमाणात बेवारस स्थितीत आढळून आल्याने हा विषय सांजापूर ग्रामस्थांमध्ये चर्चेचा ठरला आहे. सदर माल कोणाचा आहे आणि तो असा बेवारस अवस्थेत का फेकून देण्यात आला, हे एक कोडेच बनले आहे.एकीकडे राज्य शासन शेतकर्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी विविध योजना राबवून त्याचा फायदा शेतकर्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे. शेती सुजलाम् सुफलाम् व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून कृषी विभागाच्या वतीने मोफत किंवा अल्पशा दरात कीटकनाशके व खतांचा माल शेतकर्यापर्यंत पोहोचविला जातो; मात्र दुसरीकडे हाच माल बेवारस स्थितीत फेकला जात आहे. तो उघड्यावर बेवारस स्थितीत फेकण्यात आलेला माल विक्री न झाल्यामुळे फेकून दिला की यामध्ये काही घोटाळा तर नाही ना, अशी चर्चा शेतकर्यांमध्ये होत आहे. बेवारस स्थितीत पडलेला खते व कीटकनाशकांचा हा माल कृषी विभागाचा आहे की अन्य कुणाचा, याचा शोध लावणे जरुरीचे आहे. संबंधित विभागाने बेवारस मालाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सांजापूर ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कंपनीला डिस्पाज करण्याचे अधिकार आहे. त्या पद्धतीने डिस्पोजल करणे गरजेचे आहे. रासायनिक किटकनाशके उघड्यावर फेकणे घातक ठरु शकतात. तथापि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतरच कळेल. - मिलींद जंजाळ, गुणनियंत्रण अधिकारी अकोला