संतोष येलकर
अकोला: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानुषंगाने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त उमेदवारी दाखल केलेल्या ‘बंडोबां’ची संबंधित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून मनधरणी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर सोमवारी दुपारपर्यंत जिल्हयातील पोटनिवडणुकांच्या रिंगणातील उमेदवारांच्या लढती ठरणार आहेत.
जिल्हा परिषदेचे १४ गट आणि जिल्हयातील सात पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या पोटनिवडणुकांसाठी २५६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ९५ आणि पंचायत समित्यांसाठी १६१ उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अपील दाखल नसलेल्या ठिकाणी उमेदवारी मागे घेण्याची मुदत २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त उमेदवारी अर्ज दाखल असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी संबंधित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून बंडखोर उमेदवारांसोबत चर्चा करुन, त्यांची मनधरणी सुरू केली आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर जिल्हयातील पोटनिवडणुकांच्या रिंगणातील उमेदवारांच्या लढतींचे चित्र २७ सप्टेंबर रोजीच दुपारी ३ वाजतानंतर स्पष्ट होणार आहे.