अकोला : जिल्ह्यातील गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट ४६ कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून, त्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत गत आठ महिन्यांच्या कालावधीत ४० कोटी रुपये (८५ टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. गौण खनिज स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीपोटी दंडात्मक कारवाईतून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.जिल्ह्यातील वाळू, गिट्टी, मुरूम व माती इत्यादी गौण खनिजाचे स्वामित्वधन शुल्क आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीसंदर्भात दंडात्मक कारवाईतून २०१८-१९ या वर्षात ४६ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट जिल्हा खनिकर्म विभागाला देण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या तुलनेत गत एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत या आठ महिन्यांच्या कालावधीत ४० कोटी रुपये (८५ टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. त्यामध्ये गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहुकीपोटी दंडात्मक कारवाईतून वसूल करण्यात आलेल्या रकमेचा समावेश आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंतच गौण खनिजाची महसूल वसुली ८५ टक्क्यांवर पोहोचल्याने येत्या मार्चपूर्वीच जिल्हा खनिकर्म विभागाचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याची स्थिती आहे.जिल्हास्तरीय धाड पथकाच्या कारवाईतून एक कोटी वसूल!गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार गत ८ आॅगस्ट २०१७ रोजी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आकस्मिक धाड पथक गठित करण्यात आले होते. या पथकामार्फत गत नोव्हेंबर अखेरपर्यंत गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीसंदर्भात ६० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दंडात्मक कारवाईतून एक कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.
गौण खनिज महसूल वसुली उद्दिष्टाच्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत ८५ टक्के महसूल वसुली करण्यात आली असून, जिल्हास्तरीय आकस्मिक धाड पथकाने गौण खनिज अवैध वाहतूक संदर्भात केलेल्या दंडात्मक कारवाईतून एक कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी.