शहरातील बाग-बगिचे हे मोकळा श्वास घेण्याची, वृध्दांकरिता विरंगुळा तर लहानाकरिता बागडण्याची ठिकाणे आहेत. परंतु बगिचेच नसल्यामुळे शहरातील नागरिक बगिचा विकसित करण्याची मागणी करीत होते. यापूर्वी शहरात एकमेव असलेल्या नेहरू पार्कची गेल्या दोन दशकांपूर्वी देखभालअभावी दुरवस्था झाली. परिणामी शहरात एकही पार्क नव्हता. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जलतारे प्लॉट, बरडे प्लॉट व नंदिपेठ येथे हरितपट्टा विकसित करण्याचे ठरविले. त्यानुसार नंदिपेठ येथील नागरी आरोग्य केंद्राच्या उर्वरित जागेवर हरितपट्टा विकसित करण्याचे काम पूर्णत्वास जात असून, त्या ठिकाणी लॉन्स तयार करण्यात आले आहे, तर उर्वरित भागामध्ये लावण्यात आलेली फुलझाडे नागरिकांना आकर्षित करीत आहेत, जलतारे प्लॉट येथील खुल्या जागेला बांधकाम करून कुंपण घालण्यात आले आहे तर बरडे प्लॉट येथील काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांकरिता खेळणी, जिम आदीची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगर परिषदेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, अधिकारी व कर्मचारी यांचे विकासकामांमध्ये सहकार्य लाभत आहे. अकोट नगर परिषदेने शहरातील मंजूर ले-आऊटमधील रुबी जिन, संत वासुदेव विहार, रोटरी क्लब, संकल्प कॉलनी, सरस्वती नगर परिसरातील खुल्या जागांना कुंपण केले असून शहरातील उर्वरित खुल्या जागांनासुध्दा टप्प्याटप्प्याने कुंपण घालण्यात येणार आहे.
फोटो: दोन
अतिक्रमणाला पाठबळ कोणाचे?
शहरातील अनेक मोकळ्या जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. विकसित भूखंडातील मोकळ्या जागा, शाळेच्या जागा इतर ठिकाणी अतिक्रमणचा विळखा पडला आहे. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. नेहमीच लघुव्यावसायिकांचे अतिक्रमण काढणारी नगर परिषद धनदांडग्याच्या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या अतिक्रमणाला पाठिंबा कोणाचा, असा प्रश्न होत आहे.