अकोला: जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून, मागील ७२ तासांत अकोल्याच्या किमान तापमानात १० अंशांनी वाढ झाल्याने दिवसाचे तापमान वाढले आहे. शुक्रवार, १५ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.फेब्रुवारीचा पंधरवडा येताच जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ होताना दिसत असून, रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. मागील चोवीस तासांत अकोल्याचे किमान तापमान १८.३ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. हेच तापमान ११ फेब्रुवारी रोजी ९.४ डिग्री सेल्सिअस होते. गत तीन दिवसांत तापमानात वेगाने बदल झाल्याने दिवसासह रात्रीच्या उकाड्यात वाढ होताना दिसत आहे.दरम्यान, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील चोवीस तासांत वºहाडातील पाच जिल्ह्यांचे किमान तापतान बघितल्यास अकोला १८.३, वाशिम १८.०, बुलडाणा १९.०, अमरावती १७.८ तर यवतमाळचे किमान तापमान २० अंशांवर पोहोचले होते. राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नागपूर येथे १३.३ नोंदविण्यात आली.