बाळापूर : तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये नदीपात्रातून शासकीय ई-क्लास जमिनीत जेसीबीच्या साहाय्याने गौण खनिजाची चोरी होत आहे. त्यामुळे महसूल विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. डोंगरगाव शेत्शिवारात कारवाईत करीत ९६४ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त करून १ कोटी ५२ लाख ६३ हजारांचा दंड वसूल करण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला आहे.डोंगरगावचे सरपंच ब्रह्मदेव इंगळे यानी गौण खनिज माफियांविरुद्ध महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना तक्रार देऊन डोंगरगाव शिवारातील गट क्र. ६६४ या वर्ग-२ जमिनीच्या वहितीकरिता शासनाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सिलिंग कायद्यांतर्गत दिलेल्या उत्तम बन्सी तायडे रा. डोंगरगाव यांच्या १ हेक्टर ६२ आर क्षेत्र जमिनीतून जवळपास ४०५ ब्रास रेतीची अवैध वाहतूक व साठवणूक केलेला साठा जप्त करीत ६४ लाख १२ हजार ३६५ रुपये व तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरही ६ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त करीत असा एकूण ६५ लाख ०७ हजार ३६३ रुपये दंडासह प्रभाकर रामराव नेमाडे रा. डोगरगाव यांच्या शेत सर्वे नं. ६६५ क्षेत्र १ हेक्टर ०१ आर क्षेत्रातून ५५३ ब्रास अवैध उत्खनन केलेला रेती साठा जप्त करीत ८७ लाख ५५ हजार ६४९ रुपये दंड वसुलीचा आदेश दिला. या दोन्ही शेतकऱ्यांकडून सात दिवसांच्या आता १ कोटी ५२ लाख ६३ हजार १२ रुपये वसुलीचा आदेश तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिला आहे.
गौण खनिजाचे उत्खनन; १.५२ कोटींचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:58 AM