अकोला : गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आल्याचे परिवहनमंत्र्यांनी सोमवारी जाहीर केले. परंतु, अकोला विभागातील कामगार अद्यापही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संपाबद्दलचा गोंधळ अजूनही कायम आहे. एकाही आगारातून बस बाहेर निघाली नसून १२७ बसेस आगारातच आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे कारण देत अजय गुजर यांनी संप मागे घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन, कामावर रुजू व्हावे असे आवाहन कर्मचाऱ्यांना केले आहे. परंतु, मंगळवारी अकोला विभागातील एकाही आगारात कर्मचारी रुजू झाले आहे. त्यामुळे बसेसही आगारातच उभ्या आहेत. महिनाभरापासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचे दिसून येते.
४१ दिवसांच्या कालावधीत १६, ७३, ०६, ९७८ रुपयांचे नुकसान
- अकोला विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी २ नोव्हेंबरपासून संप सुरू केला. मात्र, ७ पासून सर्वच आगारातील कर्मचारी सहभागी झाले.
- परिणामी, ७ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत एसटी महामंडळाचे १६ कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विभागातील एकूण कर्मचारी - २,३००
कामावर हजर झालेले कर्मचारी - २८०
सध्या संपात सहभागी कर्मचारी - १,९२०
जिल्ह्यातील एकूण बसेस - १२७
आगारातच उभ्या असलेल्या बसेस - १२७
६६ जणांची सेवा समाप्त करणार
- संपाच्या सुरुवातीच्या काळात तीन दिवसांत अकोला विभागातील ६६ जणांचे निलंबन करण्यात आले होते.
- अल्टिमेटम देऊनही संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाले नाही. त्यामुळे चौकशीला सामोरे जावे लागत आहे.
- एसटी महामंडळाकडून या ६६ जणांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
सोमवारी संप मागे घेण्याच्या घोषणेनंतर मंगळवारी अकोला विभागातील कर्मचारी रुजू होतील, अशी शक्यता होती. परंतु, संपकरी कर्मचारी २२ डिसेंबर रोजी येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष देऊन आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
संपामुळे पदरात काय पडले?
- ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण केले. यावेळी मागणी मान्य करीत एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे सरकारकडून मान्य करण्यात आले.
- त्यानंतर दिवाळी भेट म्हणून कर्मचाऱ्यांना २५०० रुपये देण्याची घोषणा केली. तसेच कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबरपासून संप पुकारला. यादरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा करण्यात आली.