- राजेश शेगोकारअकोला: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ११ मतदारसंघांत भाजपा-शिवसेनेला विजय देणाऱ्या पश्चिम वºहाडात विधानसभा सदस्याला मंत्रिपदासाठी शेवटच्या विस्तारापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. या पृष्ठभूमीवर आता नव्या निकालांनी युतीमध्ये मंत्रिपदाच्या आशा पल्लवित झाल्या असून, मंत्रिपदाच्या दावेदारांचा दावा आणखी प्रबळ झाल्याचे दिसत आहे.अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील १५ पैकी १२ जागा जिंंकून युतीने आपली ताकद वाढविली आहे. यामध्ये भाजपाचे नऊ व शिवसेनेचे तीन आमदार आहेत. गतवेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांना मंत्रिपदासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर त्यांना मंत्री करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर डॉ. संजय कुटे यांना थेट कॅबिनेट मंत्री करून पश्चिम वºहाडातील विधानसभा सदस्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. डॉ. कुटे यांना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळाला; मात्र या चार महिन्यांत त्यांनी आपल्या कामाची छाप राज्यात निर्माण केली. ओबीसी प्रवर्ग तसेच कामगारांच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय असोत की जिगाव प्रकल्पामध्ये लालफीतशाहीने घातलेला खोडा हाणून पाडण्याचे त्यांचे धाडस असो, केवळ मतदारसंघाचा विचार न करता राज्याचा विचार करून त्यांनी अल्प कालावधीतच घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे त्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन निश्चितच मानले जात आहे. विशेष म्हणजे, ते पुन्हा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, इतर मतदारसंघांतील उमेदवारांच्या विजयासाठीही त्यांनी परिश्रम घेऊन नेतेपण जपले आहे. यावेळी त्यांना चांगल्या खात्यासह मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा आहे.अकोल्यातील ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा व प्रकाश भारसाकळे हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार समजले जातात. अकोल्यात संजय धोत्रे यांच्या रूपाने केंद्रीय राज्यमंत्री पद आधीच आहे. शिवाय, धोत्रे यांच्या नेतृत्वातच अकोल्यात महायुतीचा शतप्रतिशत विजय झालेला आहे. त्यामुळे जनमताचा आदर ठेवत एक मंत्रिपद अकोल्याला मिळेल, यात कुणालाही शंका वाटत नाही. आ. शर्मा यांनी यापूर्वी राज्यमंत्री पद भुषविले आहे, तर आ. भारसाकळे हे सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. पंचायतराज व्यवस्थेपासूनच त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. शिवाय, त्यांच्या रूपाने अकोला व अमरावती या दोन्ही जिल्ह्यांना खूश करण्याची संधी भाजपाला मिळू शकते, त्यामुळे त्यांचा दावा प्रबळ ठरत आहे.वाशिममधून भाजपाचे राजेंद्र पाटणी यांचे नाव गतवेळीही शर्यतीत होते. ते पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनाही यावेळी वाशिमला मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे.