लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने बुधवारी दहा वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने आरोपीस ठोठावली. वाडेगाव येथील रहिवासी एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची आई १५ मार्च २0१६ रोजी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेली होती. त्या सायंकाळी घरी परत आल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी घरात दिसली नाही. मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यांची मुलगी वाडेगाव येथीलच रहिवासी प्रदीप देवीदास डोंगरे (२७) याच्यासोबत असल्याची माहिती तिच्या आईला मिळाली. त्यामुळे तिच्या आईने बाळापूर पोलीस ठाण्यात २१ मार्च २0१६ रोजी मुलगी पळविल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी प्रदीप डोंगरे याच्याविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. प्रदीप डोंगरे हा मुलीला घेऊन ३0 मार्च २0१६ रोजी बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना शरण आला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीमध्ये ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रदीप डोंगरेविरोधात बलात्कार आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक मनीषा राऊत यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयासमोर आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी प्रदीप डोंगरे यास दहा वर्षांची शिक्षा आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षेचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
पीडितेच्या मुलाचे ‘डीएनए’ आरोपीशी जुळलेया अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. यावेळी तिने एका बाळाला जन्म दिला. या बाळाचे आणि आरोपी प्रदीप डोंगरे यांची डीएनए तपासणी केली असता, या दोघांचे एकमेकांसोबत जुळल्याचे निष्पन्न झाले. यावरून या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा हा प्रदीप डोंगरेच असल्याचे सिद्ध झाले आहे.