अकोला: जिल्ह्यातील गौण खनिजाचे स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि अवैध वाहतूक दंडापोटी गत मार्च अखेरपर्यंत ६२ कोटी ९८ लाख ४८ हजार रुपयांचा महसूल वसूल करीत, जिल्हा खनिकर्म विभागाने २०१८-१९ या वर्षातील गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे.२०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात ४६ कोटी रुपये गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट शासनामार्फत जिल्हा खनिकर्म विभागाला देण्यात आले होते. त्यानुषंगाने गत वर्षभराच्या कालावधीत मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या सातही तालुक्यांत वाळू, दगड, मुरूम व माती इत्यादी गौण खनिजाचे स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी ) रकमेसह गौण खनिजाच्या अवैध वाहतूकपोटी दंडात्मक कारवाईतून ६२ कोटी ९८ लाख ४८ हजार रुपयांचा महसूल जिल्हा खनिकर्म विभागामार्फत वसूल करण्यात आला. गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट ओलांडून १७ कोटी रुपयांचा जास्त महसूल जिल्हा खनिकर्म विभागामार्फत वसूल करण्यात आला आहे.२०१८-१९ या वर्षात शासनामार्फत जिल्ह्यासाठी ४६ कोटी रुपयांचे गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत जिल्ह्यात ६२ कोटी ९८ लाख ४८ हजार रुपयांचा गौण खनिज महसूल वसूल करण्यात आला आहे.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी.