प्राप्त माहितीनुसार, बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील रहिवासी गोपाल चंद्रभान हाडोळे व त्याची पत्नी प्रतिभा गोपाल हाडोळे आणि त्यांचे सहयोगी सचिन रामराव मानकर यांच्याविरुद्ध अकोल्यातील चार्टर्ड अकाउंटट विनय थावरानी यांनी १३ मार्च रोजी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून रामदासपेठ पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४२३, ४६५, ४६८, ४७१, १९७, १९८, ३४ व १२०(ब) नुसार, गुन्हे दाखल केले होते. गुन्ह्यांच्या चौकशीनंतर २३ जुलै रोजी रामदास पेठ पोलिसांनी गोपाल हाडोळे यास अटक केली होती. त्याने अंतरिम जामिनासाठी सादर केलेला अर्जही न्यायालयाने यापूर्वीच फेटाळून त्याची तुरुंगात रवानगी केली होती. त्याने कायम जमानतीसाठी सादर केलेला अर्जही प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर गोपाल हाडोळेने जिल्हा सत्र न्यायालयात कायम जमानतीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने गोपाल हाडोळे याचा तुरुंगातील मुक्काम लांबला आहे.
काय आहे प्रकरण?
चेक बाऊन्स प्रकरणात थावरानी यांनी १२ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रतिभा गोपाल हाडोळे व १६ एप्रिल २०१९ रोजी गोपाल हाडोळे याच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे चिडून जाऊन गोपाल हाडोळेने विनय थावरानी व यशपाल शर्मा यांच्या विरोधात खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. खदान पोलीस स्टेशननेही गुन्हे दाखल केले होते, मात्र दाखल करण्यात आलेली तक्रार शंकास्पद वाटल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनय थावरानी व यशपाल शर्मा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास स्थगिती देऊन थावरानी व शर्मा यांची कायम जमानतही मंजूर केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात जमानतीसाठी थावरानी यांनी सादर केलेल्या अर्जावर गोपाल हाडोळेने न्यायालयात बनावट करारनामा सादर केला होता. या करारनाम्यातील विनय थावरानी यांच्या सह्या खोट्या असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानंतर विनय थावरानी यांनी नागपूर येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडून सह्यांची तपासणी केली असता, गोपाल हाडोळेने सादर केलेल्या करारनाम्यातील विनय थावरानी यांची स्वाक्षरी खोटी असल्याचा अहवाल दिला. त्याआधारे विनय थावरानी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर गोपाल हाडोळे, त्यांची पत्नी प्रतिभा हाडोळे व सचिन मानकर यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात २३ जुलै रोजी गोपाल हाडोळे यास रामदासपेठ पोलिसांनी अटक केली होती.