अकोला, दि. ३0: पश्चिम विदर्भाचे ट्रामाकेअर सेंटर म्हणून ओळखल्या जाणार्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये दररोज काहीतरी विपरीत घटना घडतात. रुग्णालयामध्ये रुग्णांसोबतच महत्त्वाचे दस्ताऐवजसुद्धा सुरक्षित नसल्याची बाब मंगळवारी समोर आली. रुग्णालयातील शवविच्छेदन गृहामधून मच्यरुरी बुकच गायब केल्याची घटना घडली. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृतकांची माहिती असलेले हे बुक कोणी आणि कशासाठी गायब केले, असा प्रश्न वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला पडला आहे. आजारी असलेल्या, अपघातामध्ये जखमी झालेल्या किंवा इतर कारणांमुळे भरती असलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन विभागात पाठविण्यात येतो. मृतदेहांविषयी प्राथमिक माहितीसोबतच मृतदेह पोलीस, नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याची माहिती शवविच्छेदन गृहातील मच्यरुरी बुकमध्ये नोंदविल्या जाते. त्यानंतर ही माहिती संगणकामध्येसुद्धा संकलित केली जाते. मंगळवारी दुपारी एका मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात आला. या ठिकाणी या मृतकाची माहिती मच्यरुरी बुकमध्ये नोंदवायची असल्याने, संबंधित कर्मचार्यानी बुक पाहिले; परंतु त्याला शवविच्छेदन गृहामध्ये कुठेच मच्यरुरी बुक मिळून आले नाही. मच्यरुरी बुक गायब झाल्यामुळे शवविच्छेदन गृहातील कार्यरत डॉक्टर व कर्मचार्यांची धावपळ उडाली. त्यांनी वरिष्ठांच्या कानापर्यंत हा प्रकार घातला आणि मच्यरुरी बुक गायब झाल्याची कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मच्यरुरी बुक हरविले; परंतु आमच्याकडील संगणकामध्ये संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे मच्यरुरी बुकमुळे फारसा फरक पडणार नाही. यासंबंधीची तक्रार आम्ही पोलिसात नोंदविली आहे. - डॉ. दिनेश नेताम, उप वैद्यकीय अधीक्षक, सर्वोपचार रुग्णालय
सर्वोपचारमधील शवविच्छेदन गृहातून मच्यरुरी बुक गायब!
By admin | Published: August 31, 2016 2:47 AM