अकोला : उत्तर प्रदेशातील कानपूर येथून हरविलेला व अकोला स्थानकावर आढळून आलेल्या बालकास बालकल्याण समितीच्या आदेशाने ९ जुलै रोजी त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. अकोला रेल्वे स्टेशनवर १५ वर्षांचा बालक विना पालक भटकत असताना रेल्वे चाईल्ड लाईनच्या सदस्याला दिसला. अल्पवयीन असल्याने त्याला बालकल्याण समितीच्या समक्ष सादर करण्यात आले. समितीच्या आदेशाने त्या बालकास शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह या संस्थेत दाखल करण्यात आले.
हा बालक मितभाषी असून, कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हता. शासकीय बालगृहाचे समुपदेशक नंदन शेंडे व जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे समुपदेशक सचिन घाटे यांनी त्याला विश्वासात घेत त्याच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर कानपूर पोलिसांशी संपर्क साधला व पोलिसांनी त्याचे घर शोधले. पालकांचा संपर्क क्रमांक प्राप्त झाल्यावर बालगृहाच्या अधीक्षक जयश्री हिवराळे यांनी बालकाच्या पालकांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला. बालक सुखरूप असल्याबाबत त्यांना सांगण्यात आले.
पूर्ण प्रक्रिया जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, बालकल्याण समिती अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, बालकल्याण समिती सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जैस्वाल, ॲड. शीला तोष्णीवाल, डॉ. विनय दांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये शासकीय बालकाचे अधीक्षक जयश्री हिवराळे, समुपदेशक नंदन शेंडे, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर, सचिन घाटे यांनी प्रयत्न केले.
अन् दोघांच्याही डोळ्यात तरळले आनंदाश्रू
बालकास घेण्यासाठी त्याचे पालक ९ जुलै रोजी अकोला येथे दाखल झाले. पालकांना पाहताच तो भावुक झाला. यावेळी बालक व पालक दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. विहीत प्रक्रिया पूर्ण करून बालकल्याण समितीच्या आदेशाने त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.