अकोला: सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी तिचा शोध लावला. भंडारा येथे मित्रासोबत असलेली मुलगी शनिवारी अकोला रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर मुलीने आई-वडिलांसोबत राहण्यास नकार देत गायत्री बालिकाश्रम येथे राहण्यास पसंती दर्शविल्याने पोलिसांनी तिला सुरक्षेच्या दृष्टीने आश्रमात ठेवण्यात आले आहे.मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सदर मुलीच्या वडिलांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. यासोबतच अपहरण करणाऱ्यांची नावेही पोलिसांना देण्यात आली; मात्र सिव्हिल लाइन पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मुलीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत मुलीला शोधण्यासाठी विनंती केली. या प्रकरणाची तक्रार गृहमंत्र्यांकडे झाल्यानंतर दोन अधिकारी निलंबित करण्यात आले, तर पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सहा दिवसांत मुलीचा शोध घेतला; मात्र आता मुलीने आई-वडिलांसोबत राहण्यास नकार दिल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आरोपी युवक अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या मुलीची बालकल्याण समितीकडून चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतरच या घटनेतील सत्यता समोर येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.