सदानंद सिरसाटअकोला: शिधापत्रिकांचे संगणकीकरण केल्यानंतर त्यामध्ये आधार कार्ड, मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी दुकानदारांनी दिलेल्या यादीत भलतीच नावे घुसडण्यात आली आहेत. दुकानदारांकडे पूर्वी असलेल्या नावांचा त्यातून शोध घेऊन यादी पुन्हा तयार करण्याचे काम दुकानदारांनाच सोपवण्यात आल्याने या प्रक्रियेत मोठा गोंधळ माजला आहे. विशेष म्हणजे, जिल्हय़ातील सव्वातीन लाखांपेक्षाही अधिक शिधापत्रिकाधारकांची माहिती अपलोड करण्यासाठी नियुक्त कंत्राटदाराने केलेला घोळ आता दुकानदारांसह अधिकारी, कर्मचार्यांना निस्तरण्याची वेळ आली आहे.ऑनलाइन धान्यवाटपाची पूर्वतयारी म्हणून बोगस शिधापत्रिका शोधणे, त्यासोबतच लाभार्थींचे आधारकार्ड, मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी २0१२ पासून दोनवेळा शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यात आले. मे २0१५ मध्ये आधार कार्ड, मोबाइल क्रमांक अपलोड करण्यासाठी बुलडाणा येथील भारती कॉम्प्युटर्स यांना निविदेतून काम देण्यात आले. कामाचे आदेश देताना जिल्हाधिकार्यांसोबत झालेल्या करारनाम्यात काम बिनचूक करण्याची अट आहे. त्या अटीनुसार कामच झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.माहिती अपलोड करतानाच गोंधळसंगणकात आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी दुकानदारांकडून यादी आणि कागदपत्राचा वापर करणे बंधनकारक होते; मात्र त्यामध्येच कंत्राटदार भारती कॉम्प्युटरने गोंधळ घातला. अकोला शहरातील १२३ दुकानदारांनी दिलेल्या यादीनुसार एकही यादी तयार झाली नाही. दुकानदारांकडे असलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या शंभर ते तीनशेने वाढल्याची यादी त्यांच्या हातात देण्यात आली. तर अनेकांच्या दुकानात जोडलेली शेकडो नावे गहाळ करण्यात आली. हा प्रकार पाहताच पुरवठा विभागाच्या तोंडचे पाणीच पळाले. त्यातच यादीनुसार पॉस मशीनद्वारे वाटप बंधनकारक असल्याने दुकानदारांसह प्रशासन दुहेरी अडचणीत आले.शिधापत्रिकांचे संगणकीकरण झाल्यानंतर फेरपडताळणी करावीच लागणार होती. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू आहे. याद्यांमध्ये झालेला गोंधळ तांत्रिक कारणांमुळे आहे. तो दूर करण्यासाठी दुकानदारांच्या नावे निघत असलेली यादी त्यांच्याकडूनच पडताळणी केली जात आहे. - रमेश पवार, अन्नधान्य वितरण अधिकारी
हजारो शिधापत्रिकाधारकांची नावे गहाळ
By admin | Published: May 07, 2017 2:44 AM