मूर्तिजापूर- माना पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यातील पोही येथील महिला शिलाबाई अशोक मुळे (४५) आज ७ जुलै रोजी गावालगत असलेल्या नाल्याच्या पुरात वाहून गेली आहे. तालुक्यातील पोही-लंघापूर येथील दोन महिला सकाळी शेतात कामावर गेल्या होत्या. पावसाचा जोर अधिक वाढत असल्याने त्या दुपारी २.३०च्या सुमारास घरी परत येण्यासाठी निघाल्या असता गावालगत असलेल्या नाल्याच्या पुरातून जात असताना शिलाबाई अशोक मुळे या महिलेचा अचानक पाय घसरल्याने ती नाल्याच्या पुरात वाहून गेली, सोबतची महिला सुखरूप बचावली.वाहून गेलेल्या महिलेचा अजूनपर्यंत शोध लागला नसून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. अंधार असल्याने व पाण्याच्या प्रवाहात जोर असल्याने शोधकार्यात प्रचंड अडचण येत आहे. पिंजर येथील गाडगेबाबा बचाव पथक व जिल्हाधिकारी कार्यालयाचे बचाव पथक महिलेचा शोध घेत आहे.ज्या नाल्यामध्ये महिला वाहून गेली आहे तो नाला पोही गावापासून पुढे उमा नदीला मिळत असल्याने पोहीपासून दोन किलोमीटर अंतरावर रोहणा गावाजवळ उमा नदीवर पूल आहे, त्या पुलापासून शोधमोहीम अजूनपर्यंत सुरू आहे, वृत्त लिहीपर्यंत महिलेचा शोध लागला नही. माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे, तहसीलदार राहुल तायडे घटनास्थळी तळ ठोकून आहेत. मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत.
महिला नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 9:23 PM