लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून तत्कालीन सीईओ आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून शाळांमध्ये मिशन मॅट्रिक हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामुळे यंदा इयत्ता दहावी निकालाच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा माध्यमिक शिक्षण विभागाने केला आहे.मिशन मॅट्रिक उपक्रमामुळे शेकडो शाळांना फायदा झाला आहे. जिल्ह्यातील १६0 शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. एवढेच नाहीतर जिल्ह्यातील २८९ शाळांचा निकालही ७५ टक्क्यांच्यावर लागला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी २0१९ या वर्षात जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये मिशन मॅट्रिक हा उपक्रम राबविला. मिशन मॅट्रिक उपक्रमांतर्गत तीन उद्दिष्टे ठेवण्यात आली होती.जिल्ह्यातील ज्या शाळांचा निकाल ३0 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या शाळांचा निकाल ५0 टक्क्यांनी वाढविणे, प्रत्येक शाळेचा निकाल ६ टक्क्यांनी वाढविणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल ३ ते ५ टक्क्यांनी वाढविण्याचे टार्गेट ठरविण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक माध्यमिक शाळेला कृती कार्यक्रम ठरवून दिला होता.आॅक्टोबर २0१९ मध्ये प्रत्येक मुख्याध्यापकाकडून इयत्ता दहावीचा निकाल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांचे सादरीकरण करून घेण्यात आले होते. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने मुख्याध्यापकांच्या सादरीकरणाचे विश्लेषण करून कमकुवत विद्यार्थ्यांना कसे पास श्रेणीत आणता येईल, याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने मुख्याध्यापक, शिक्षकांना सूक्ष्म नियोजन करून दिले. सराव परीक्षा घेणे, सराव परीक्षेच्या निकालाचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. याच कारणांमुळे यंदा इयत्ता दहावीचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे. मिशन मॅट्रिक उपक्रमांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव, मुख्याध्यापक, शिक्षकांनी परिश्रम घेतले.
गतवर्षी ३0 टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या ३१ शाळांचा निकालातही वाढगतवर्षी दहावीच्या निकालात जिल्ह्यातील ३१ शाळांचा निकाल ३0 टक्क्यांपेक्षाही कमी लागला होता. यंदा मिशन मॅट्रिकमुळे या शाळांच्या निकालातही सुधारणा झाली आहे. या ३१ शाळांचा निकाल ५0 ते ७५ टक्के लागला आहे.
मिशन मॅट्रिक उपक्रमाचा जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना फायदा झाला आहे. यंदा दहावीचा निकाल २५ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी १00 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२0 होती. आता त्यात ४0 ने वाढ झाली आहे.-प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक