अकोला: एकीकडे मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून नागरिकांना भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणीसाठी प्रयत्न करायचे, अन् दुसरीकडे अकोलेकरांच्या खिशातून वसूल केल्या जाणार्या कर वसुलीच्या रकमेतून उधळपट्टी करण्याचे धोरण प्रशासन व सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुरू केल्याचे चित्र आहे. घाणीचे ढीग कायम असताना पडीत प्रभागात साफसफाईचा दावा करणार्या ठेकेदारांची तब्बल १ कोटी ७0 लाख रुपयांची देयके गुरुवारी प्रशासनाने अदा केली. यामधील बहुतांश देयके चक्क नगरसेवकांचीच असल्याची माहिती आहे. महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागाने साफसफाईसाठी भिन्न पद्धतीचा अवलंब केला आहे. मनपाच्या आस्थापनेवर ७४0 सफाई कर्मचारी असून, संबंधित कर्मचारी केवळ प्रशासकीय प्रभागात साफसफाईची कामे करतात. यामध्ये १४ प्रभागांचा समावेश आहे. तर उर्वरित २२ प्रभागांमध्ये (४४ वार्ड) पडीतच्या संकल्पनेनुसार खासगी सफाई कर्मचारी साफसफाई करतात. यामध्ये काही प्रभागात साफसफाई करणार्या ठेकेदारांना महिन्याचे ५0 हजार रुपये, तर काही प्रभागातील ठेकेदारांना महिन्याकाठी ८0 हजार रुपयांचे देयक अदा केले जाते. मागील ११ महिन्यांपासून संबंधित ठेकेदारांची देयके थकीत ठेवण्यात आली. देयके थकीत असतानासुद्धा खासगी सफाई कर्मचारी नियमितपणे साफसफाईची कामे करीत असल्याचा दावा करतात, हे येथे उल्लेखनीय. मुळात, पडीत प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सर्व्हिस लाइनची साफसफाई करण्यासाठी कर्मचारीच फिरकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. थातूर-मातूर स्वच्छतेची कामे करून नागरिकांच्या डोळ्य़ात धूळफेक करण्याचे काम प्रशासन, ठेकेदार व संबंधित नगरसेवकांनी चालवले आहे. पडीत प्रभागात साफसफाईची बोंब असताना आयुक्त सोमनाथ शेटे, प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी कामांचे मूल्यमापन न करता कोट्यवधींची देयके अदा केली, हे विशेष. ऑनलाइन पद्धतीने खात्यात रक्कम पडीत प्रभागात साफसफाई केली, असा अप्रत्यक्ष शेरा देत प्रशासनाने १ कोटी ७0 लाखांची देयके अदा केली. संबंधित ठेके दारांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम गुरुवारी जमा झाली. आयुक्त सोमनाथ शेटे यांनी मुंबईला जाण्यापूर्वीच संबंधित फाइलवर स्वाक्षरी केल्याची माहिती आहे. त्यानंतर तीन टक्के रकमेच्या मोहापायी इतर अधिकार्यांनी फाइलचा पुढील प्रवास सुकर केला.
होय,'अच्छे दिन' आले!
शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणांसह सर्व्हिस लाइनमध्ये घाणीचे ढीग साचले आहेत. यामुळे अकोलेकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असला तरी सत्ताधार्यांप्रमाणेच विरोधी पक्षालादेखील काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसून येते. सर्वपक्षीय नगरसेवकांची थकीत देयके अदा होत असतील, तर होय,ह्यअच्छे दिनह्ण आले, असा सूर मनपा वतरुळात उमटत आहे.