अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेचे पाणी शेवटच्या गावातील टाकीत पोहोचविण्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी २० लाख रुपये खर्च झाल्यानंतरही अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेच नाही. काही दुरुस्ती थातूरमातूर, निकृष्ट साहित्याने झाल्याचा प्रकार घडला. त्याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीने मागविल्यानंतरही ती देण्यास महिनाभरापासून टाळाटाळ सुरू असल्याचा प्रकार घडत आहे.८४ खेडी योजनेत समाविष्ट गावांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरण्यास सातत्याने नकार दिला. त्याचा भार जिल्हा परिषदेवर पडत आहे. दरमहा १५ लाख २५ हजार रुपये या गावांना पाणी पुरवठ्यासाठी देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावे लागतात. ही समस्या पाहता प्रत्येक गावातील टाकीत पाणी पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी २०१५ च्या टंचाईमध्ये योजनेतील गावांच्या टाकीत पाणी पोहोचण्यासाठी १० कोटी २० लाख रुपये निधी शासनाने दिला. तो निधी दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खर्च केला. त्यानंतर योजनेतील सर्वच गावांच्या टाकीत पाणी पोहोचून ते प्रत्येक प्रभागात जाणे क्रमप्राप्त होते; मात्र एवढी रक्कम खर्च करूनही २८ गावांतील टाक्यांमध्ये पाणी पोहोचले नाही. त्यामुळे या गावांमध्ये पाण्यासाठी सातत्याने ओरड सुरू आहे. ही बाब ‘लोकमत’ने १४ आॅक्टोबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध केली. त्यावर १६ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत खडाजंगी झाली. सदस्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांना माहिती मागविली; मात्र ती दिली नाही. आठवडाभरात ती देण्याचे सभेत सांगण्यात आले. त्यावर आता २५ दिवस उलटले, तरीही माहिती जिल्हा परिषदेला देण्यात आली नाही, हे विशेष.
दुरुस्तीचीही अनेक कामे अर्धवटगावांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या जलवाहिनीवरच नळ जोडणी केली. ही समस्या निकाली काढण्यासाठी गावातून जाणारी जलवाहिनी लोखंडी (डीआय) करणे आवश्यक होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १४४ किमी पीव्हीसी जलवाहिनीपैकी ५६ किमी बदलली.
अभियंत्यांच्या अहवालानंतरही कारवाईला बगलयोजनेतून झालेली कामे तरीही टाकीमध्ये पाणी न पोहोचलेल्या गावांची पडताळणी करण्यासाठी शाखा अभियंता ए. व्ही. देशमुख, आर. के. चौधरी यांनी संयुक्त पाहणी केली. त्यांच्या अहवालात २७ गावांतील टाक्यांमध्ये पाणी पोहोचत नसल्याचे उघड झाले. धनकवाडी, करतवाडी अ, सावरगाव, विटाळी, पुंडा, बांबर्डा, रोहणखेड, कावसा बु., कावसा खु., तरोडा, रेल, धारेल, दनोरी-पनोरी, दहीहांडा, वडद बु., केळीवेळी, जऊळखेड बु., ठोकबर्डी, पाटसुल, लामकानी, पळसोद, निजामपूर, देवर्डा, पारळा, किनखेड, पिलकवाडी, हनवाडी, नांदखेड, सांगवी, नेर, पिवंदळ खु. या गावांमध्ये टाकीत पाणी पोहोचण्यासाठी अनेक कामे झाली नसल्याचे अहवालात नमूद आहे.