अकोला : शिवसेनेने भावना गवळी यांना वाशिम लोकसभा मतदारसंघातून तब्बल सहा वेळा उमेदवारी दिली. पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना लोक गद्दारच म्हणतील. परंतु जे स्वतःला गद्दार समजत नाहीत, त्यांच्या नाकाला मिरच्या का झोंबतात, असा सवाल करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी खासदार गवळी यांनी दिलेली पोलीस तक्रार खोटी असल्याचा आरोप गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
विदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभांचे आयोजन केले जाणार आहे. त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत २२ नोव्हेंबर रोजी अकोल्यात आले होते. दरम्यान, मुंबईकडे जाण्यासाठी खा.विनायक राऊत अकोला रेल्वे स्थानकावर आले असता त्याच गाडीने प्रवास करण्यासाठी शिंदे गटाच्या खा. भावना गवळी रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या होत्या. यावेळी काही शिवसैनिकांसह उपस्थित प्रवाशांनी खासदार गवळी यांच्याकडे पाहून '५० खोके एकदम ओके' व गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या, असे आ. नितीन देशमुख यांनी सांगितले.
याप्रकरणी खासदार गवळी यांनी अकोला पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीत खासदार राऊत व आमदार देशमुख यांनी चिथावणी दिल्याचे नमूद आहे. तक्रारीमध्ये लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांवर करण्यात आलेले आरोप अत्यंत बिनबुडाचे व खोटे असल्याचा दावा आमदार देशमुख यांनी केला. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, मुकेश मुरूमकार, तालुकाप्रमुख विकास पागृत, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, महिला आघाडीच्या ज्योत्सना चोरे, देवश्री ठाकरे यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
होय, त्यांना गद्दारच म्हणणार!शिवसेनेसोबत प्रतारणा करणाऱ्यांना आम्ही गद्दारच म्हणणार. आमच्या कुटुंबातील व्यक्तींनी लोकप्रतिनिधी म्हणून पक्षासोबत गद्दारी केली असती तर आम्हालाही या सर्व बाबी सहन कराव्या लागल्या असत्या, असे सांगत यापुढे खा. गवळी यांच्या मतदारसंघात जाऊन बैठका घेणार असल्याचे आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले.
विदर्भातील खासदारांना शिंदेंवर अविश्वासविदर्भातून शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांना निवडणुकीत पराभवाची चिंता सतावू लागली आहे. विदर्भात एका ठिकाणी पार पडलेल्या गुप्त बैठकीत पुढील निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढण्यावर या खासदारांचे एकमत झाल्याचा गौप्यस्फोट आमदार नितीन देशमुख यांनी केला. या खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याचा खोचक टोला आ. देशमुख यांनी लगावला.