लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी सकाळी पीएच मार्केटमधील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. वसतिगृहातील स्वच्छता, भोजनाचा दर्जा, निवासाची दुरवस्था पाहून संतापलेल्या आमदार सावरकरांनी वसतिगृह अधीक्षकाला चांगलेच खडसावले आणि अधीक्षकाची आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विभागीय संचालक सरोदे, प्रकल्प विकास अधिकारी वनिता सोनवणे यांच्याकडे तक्रार करून कारवाई करण्यास सांगितले. पीएच मार्केटमधील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहामधील सुविधा, भोजनाचा दर्जा याबाबत आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार सावरकर यांनी महापौर विजय अग्रवाल, गिरीश जोशी, डॉ. संजय शर्मा, प्रशांत अवचार, उमेश गुजर यांच्यासोबत आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला भेट दिली आणि वसतिगृहाची पाहणी केली. पाहणीदरम्यान आमदार सावरकर यांना वसतिगृहामध्ये ठिकठिकाणी अस्वच्छता दिसून आली. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या भोजनाचा दर्जाही निकृष्ट असल्याचे दिसून आले. एवढेच नाही, तर विद्यार्थी राहात असलेल्या वसतिगृहातील खोल्यांची दुरवस्था झाल्याचे दिसून आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची विदारक परिस्थिती पाहून आमदार रणधीर सावरकर संतप्त झाले आणि त्यांनी वसतिगृह अधीक्षक मदन इंगोले यांना जाब विचारला. अधीक्षक निरूत्तर झाल्यामुळे आमदार सावरकर यांनी थेट आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आदिवासी विकास प्रकल्प संचालक सरोदे आणि प्रकल्प विकास अधिकारी वनिता सोनवणे यांच्यासोबत संपर्क साधून आदिवासी वसतिगृहातील गैरव्यवस्था त्यांच्या कानावर घातली आणि वसतिगृह अधीक्षक मदन इंगोले यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी करीत, आदिवासी वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, भोजन उपलब्ध करून देण्यात यावे आणि शासनाच्या विकास योजनांना काळिमा फासण्याचे काम अधिकारी, कर्मचार्यांच्या माध्यमातून होता कामा नये, असे आमदार सावरकर यांनी बजावले. आमदार सावरकरांनी आदिवासी वसतिगृहाला भेट दिल्याचे पाहता, प्रकल्प अधिकारी वनिता सोनवणेसुद्धा वसतिगृहात हजर झाल्या. यावेळी प्रकल्प अधिकारी सोनवणे यांच्याकडे वसतिगृह अधीक्षक मदन इंगोले यांच्या गैरव्यवस्थेचा पाढाच आमदारांनी वाचला. यावेळी प्रकल्प अधिकारी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेता, इंगोले यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
वसतिगृहातील असुविधांबाबत अधीक्षकाला आमदारांनी खडसावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:33 AM
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी सकाळी पीएच मार्केटमधील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. वसतिगृहातील स्वच्छता, भोजनाचा दर्जा, निवासाची दुरवस्था पाहून संतापलेल्या आमदार सावरकरांनी वसतिगृह अधीक्षकाला चांगलेच खडसावले आणि अधीक्षकाची आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विभागीय संचालक सरोदे, प्रकल्प विकास अधिकारी वनिता सोनवणे यांच्याकडे तक्रार करून कारवाई करण्यास सांगितले.
ठळक मुद्देआमदार सावरकर यांची वसतिगृहाला भेट समस्या निकाली काढण्याचे प्रकल्प अधिकार्यांचे आश्वासन