अकोला : कोरोना संसर्ग काळात सण, उत्सवांमध्ये प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याचा कल कोरोना काळात कमी झाला असला, तरी यासाठी सोशल मीडियाचे दालन मात्र खुले आहे. श्रावण महिन्यात सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत जनतेला श्रावण सोमवार, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला आदी सणांच्या फेसबुक, ट्विटरवरून ऑनलाइन शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रावण फेसबुकवरच
रणधीर सावरकर ॲक्टिव्ह
प्रत्यक्ष जनसंपर्कासह सोशल मीडियाच्या सर्व मंचांवर कमालीचे ॲक्टिव्ह राहणारे अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर हे फेसबुक व ट्टिटरचा मोठ्या खुबीने वापर करतात. श्रावण महिन्यातील सोमवार, नागपंचमी, स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन या सण, उत्सवांच्या शुभेच्छा त्यांनी ऑनलाइन दिल्या आहेत.
प्रकाश भारसाकळे फेसबुकवर सक्रिय
अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या फेसबुक अकाउंटवर स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या ऑनलाइन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या शुभेच्छा त्यांच्या अकाउंटवर टॅग केल्या आहेत.
नितीन देशमुखही दक्ष
आपला माणूस, अशी ओळख असलेले बाळापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या फेसबुक अकाउंटवरूनही स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
खासदार फेसबुक, ट्विटरवर दमदार
अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा माजी केंद्रिय मंत्री संजय धोत्रे हे फेसबुक व ट्विटर या दोन्ही माध्यमांवर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. या दोन्ही माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात त्यांचा हातखंडा असून, त्यांनी फेसबुक व ट्विटरवरून स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शर्मा, पिंपळे निरंक
अडीअडचणीत धावून जाणारे, अशी ओळख असलेले अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचा प्रत्यक्ष संपर्कावर भर असताे. त्यांच्या फेसबुक अकाउंटवर रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा नसल्या तरी, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या फेसबुक अकाउंटवर श्रावण महिन्यातील कोणत्याही सण, उत्सवाच्या शुभेच्छा नाहीत.