- संतोष येलकर
अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतमजुराच्या हाताला काम नसताना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीचा जिल्ह्यातील कामांचा कृती आराखडा जिल्हा परिषदमार्फत अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे सादर करण्यात आला नाही. जिल्हा परिषदेच्या दिरंगाईत रोहयो कामांचा आराखडा अडकल्याने, आराखड्यास मंजुरी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यातील गावांसह अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत दुष्काळग्रस्त गावांमध्ये शेतमजुरांसह बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. गावागावांमध्ये मजूर कामाच्या शोधात असताना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीचा जिल्ह्यातील रोहयो कामांचा कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागामार्फत अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे सादर करण्यात आला नाही. जिल्ह्यातील रोहयो कामांचा आराखडा जिल्हा परिषदेत अडकल्याने, आराखडा मंजुरीसाठी नरेगा आयुक्तालयाकडे पाठविण्याची प्रक्रियादेखील रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रोहयो कामांच्या आराखड्यास मंजुरी मिळण्यासाठी विलंब होणार असल्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यताही प्रलंबित!रोहयो कामांच्या जिल्ह्यातील कामांच्या कृती आराखड्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत आराखडा नरेगा आयुक्तालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे; मात्र जिल्हा परिषदमार्फत रोहयो कामांच्या आराखड्यास सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे आराखड्यास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता केव्हा घेण्यात येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मजुरांच्या हाताला केव्हा मिळणार काम?जिल्ह्यातील रोहयो कामांचा आराखडा जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागामार्फत अद्याप तयार करण्यात आला नाही. त्यामुळे आराखड्यास मंजुरी देण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. त्यानुषंगाने आराखड्याला मंजुरी केव्हा मिळणार आणि जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला रोहयो अंतर्गत प्रत्यक्षात काम केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.आराखडा सादर करण्याचे निर्देश!रोहयो अंतर्गत जिल्ह्यातील २०१९-२० या वर्षातील कामांचा आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत १२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.