अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील २८ हजार ६४२ ग्रामपंचायतींपैकी सद्यस्थितीत ८ हजार १४४ ग्रामपंचायतींच्या स्तरावर कामे सुरू असून, उर्वरित २० हजार ४९८ ग्रामपंचायत स्तरावर ‘रोहयो’ची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मोठ्या शहरातून गावाकडे परतलेल्या मजुरांच्या हाताला काम नाही. या पृष्ठभूमीवर गाव पातळीवर मजुरांकडून कामाची मागणी होताच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतींच्या स्तरावर कामे केली जातात; परंतु महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राज्य आयुक्तालयाच्या अहवालानुसार १४ सप्टेंबरपर्यंत राज्यातील २८ हजार ६४२ ग्रामपंचायतींपैकी केवळ ८ हजार १४४ ग्रामपंचायतींच्या स्तरावर रोजगार हमी योजनेची कामे सुरू असून, राज्यातील उर्वरित २० हजार ४९८ ग्रामपंचायत स्तरावर रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींकडून रोहयोची कामे केव्हा सुरू करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.