अकोला: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बंदद्वार चर्चा केली. चर्चेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीबद्दल राज ठाकरे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी कार्यकारिणीच बरखास्त करून टाकली. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती.मनसे प्रमुख राज ठाकरे हे वाशिम येथून दुपारी ४.३0 वाजता अकोल्यात आले. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले. काही वेळानंतर त्यांनी मनसे पदाधिकारी व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसोबत बंदद्वार चर्चा केली. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला. गावागावांमध्ये जाऊन पक्षाचे संघटन वाढविण्यासोबत जनतेच्या समस्यांना घेऊन आंदोलन करण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी पदाधिकाºयांना दिले आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहण्याचा सल्ला दिला; परंतु काही कार्यकर्त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीबद्दल राज ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. पक्षाचे पदाधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाहीत. कार्यकारिणीत कार्यकर्त्यांना स्थान मिळत नाही, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता, राज ठाकरे यांनी बैठकीतच शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करीत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे, संजय चित्रे, प्रवीण मर्गज, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, रामा उंबरकार, आदित्य दामले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राज ठाकरे यांना भेटण्यासाठी तरुणाईची गर्दी!मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाहता यावे, त्यांची भेट घेता यावी आणि त्यांच्यासोबत एखादी सेल्फी घेता यावी, यासाठी शेकडो तरुणांनी शासकीय विश्रामगृहावर गर्दी केली होती; परंतु वेळेच्या अभावामुळे राज ठाकरे यांनी दौरा आटोपता घेतल्यामुळे तरुणाईचा हिरमोड झाला. त्यांच्या स्वागतासाठी तरुणांनी आणलेले पुष्पगुच्छ तसेच परत न्यावे लागले.
चिमुकल्या कलावंताने दिले चित्र भेट!राज ठाकरे यांना भेटण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांसोबतच कलावंतांनीसुद्धा मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे यांचा समर्थक सहावीत शिकणारा निसर्ग नितीन धारस्कर याने स्वत: हाताने काढलेले राज ठाकरे यांचे छायाचित्र त्यांना भेट दिले. यावेळी राज यांनी निसर्ग धारस्करच्या कलागुणांचे कौतुक केले.