- सचिन राऊत
अकाेला : मोबाइलमुळे वाढता विसंवाद, मद्य पिण्याचे वाढते प्रमाण, चारित्र्यावर संशय अशा विविध कारणांमुळे गृहकलहांत वाढ होत आहे. वाढते वाद वेळीच न मिटल्यास अनेक सुखी संसार मोडकळीस देखील येतात. गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे भरोसा सेलकडे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाने केले आहे. मोबाइल, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, मद्य आणि नशा, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ आदी कारणांमुळे पती, पत्नीत वाद होऊन प्रकरण पोलीस ठाणे आणि न्यायालयात पोहोचण्याच्या प्रमाणात अलीकडे वाढ झाली आहे. त्यातून पुढे काही प्रकरणे
काडीमोडपर्यंत देखील पोचली आहेत. पती, पत्नीतील वादाचे हे प्रकरण सर्वप्रथम भरोसा सेलकडे जाते. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करून वाट मिटविण्यात येत आहेत़
चारित्र्यावर संशय हेच कारण
नेहमीच मोबाइलवर बोलणे, व्हॉट्सअॅप, फेसबुक बघत बसणे, घरात लक्ष न देणे, स्वयंपाक येत नाही, माहेरहून पैसे आणत नाही अशी वादाची विविध कारणे आहेत.
त्याचबरोबर पती, पत्नी एकमेकांवर संशय घेतात, घरात वेळ देत नाहीत, अशा तक्रारी देखील वाढत आहेत.
बायकोचा जाच वाढला
अनेकदा पती किंवा सासरच्या मंडळींकडून महिलांचा छळ केला जातो. या वेळी जाच वाढल्याची देखील काही प्रकरणे समोर येत आहेत. महिलांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे देखील काही पुरुषांना मनस्ताप सहन करावा लागतो.
नेहमी आईशी बोलते म्हणून वाद
मोबाइल हे पती-पलीच्या भांडणाचे कारण असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पत्नी नेहमीच आई आणि बहिणीसोबत फोनवर बोलत असते. त्यामुळे तिचे घरातील कामाकडे लक्ष नसते, अशा प्रकारच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे़
अन् पुन्हा फुलले संसार
पती, पत्नीच्या वादाची प्रकरणे भरोसा सेलकडे पाठविली जातात. या कक्षातील अधिकारी दोघांचेही समुपदेशन करुन संसार पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरात आलेल्या सुमारे ४०० प्रकरणांपैकी जवळपास २५० पेक्षा अधिक संसार पुन्हा फुलले आहेत.