अकोला: दोन नामांकित कंपनीच्या मोबाइल टॉवर मर्जच्या प्रक्रियेमुळे गत काही दिवसांपासून मोबाइल हँग होत असल्याच्या घटना अनेक जण अनुभवत आहेत. ही समस्या आणखी आठवडाभर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.गत काही दिवसांपासून सेल्युलर मोबाइल नेटवर्कच्या समस्येमुळे सेल्युलर मोबाइलधारक त्रस्त आहेत. कधी भ्रमणध्वनी डायल होत नाही, तर डायल झालेल्या कॉलवर आवाज ऐकवत नाही. सेकंदात जाणारा व्हॅट्स अॅपचा आणि मेलचा काही केबीचा डेटा वारंवार पाठविण्याची वेळ येत आहे. नेटवर्क मिळत नसल्याने आॅनलाइनच्या एकंदरीत कामकाजावरच फरक पडला आहे. मध्येच इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित होत असल्यामुळे सेल्युलर मोबाइल वापरणारे कमालीचे त्रासले आहे. या समस्येचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता, यामागे दोन मोठ्या कंपन्यांमध्ये झालेला व्यवहार कारणीभूत ठरत आहे. एका मोठ्या मोबाइल सेल्युलर कंपनीला दुसरा बड्या कंपनीने विकत घेतले आहे. हा आर्थिक व्यवहार जरी पूर्ण झाला असला तरी मोबाइल टावर्सवरील तांत्रिक कनेक्टिव्हिटीची समस्या अद्याप संपलेली नाही. त्यामुळे अकोलेकरांचे सेल्युलर मोबाइल काही दिवसांपासून सतत हँग होत आहेत. तांत्रिक कनेक्टिव्हिटीच्या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीसाठी अजून आठ दिवस लागणार आहे. त्यामुळे ही समस्या अजून आठ दिवस तरी कायम राहणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही समस्या केवळ अकोल्यापुरता मर्यादित नाही तर सर्वत्रच ही समस्या असल्याचेही सूत्रांनी सांगितले.