लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्नित (लिंक ) करण्यासाठी सेतू केंद्रांकडून विद्यार्थी-पालकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे यासंदर्भात सोमवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजना, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्नित असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने अकोला शहरासह जिल्ह्यात सेतू केंद्रांवर आधार क्रमांकासोबत मोबाइल क्रमांक ‘लिंक ’ करण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे; मात्र आधार क्रमांकाशी मोबाइल क्रमांक ‘लिंक’ करण्यासाठी सेतू केंद्रांकडून विद्यार्थी-पालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. तर ‘आधार’शी मोबाइल क्रमांक ‘लिंक’साठी सेतू केंद्रांकडे जाण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांगितले जात आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरणार्या विद्यार्थ्यांना आधार क्रमांकाशी मोबाइल क्रमांक लिंक करण्यासाठी नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर काही विद्यार्थी -पालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन विचारणा केली.
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता आधार क्रमांकाशी मोबाइल क्रमांक ‘लिंक’ असणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘आधार’शी मोबाइल क्रमांक ‘लिंक’ करण्याकरिता सेतू केंद्रांवर गेल्यास, त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात असून, जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचे सांगितले जात आहे.-विनोद रामराव ठाकरेविद्यार्थिनीचे पालक, अकोला.
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांकासोबत मोबाइल क्रमांक ‘लिंक’ करण्याकरिता विद्यार्थी-पालकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे.- संजय खडसे उपविभागीय अधिकारी, अकोला.