अकोला: मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) साठी काम करणाऱ्या इंटरकनेक्शन टेलीकॉम सोल्युशन्स आणि सिनिव्हर टेक्नॉलॉजी या दोन कंपन्या तोट्यात आल्यामुळे आणि सोबतच दोन्ही कंपन्यांचा परवाना आगामी मार्च २०१९ संपुष्टात येत असल्याने ग्राहकांना स्वातंत्र्य देणारी ही सेवा संपुष्टात येण्याचे संकेत आहे. मार्चदरम्यान जर काही वाटाघाटी झाल्या तरच यामध्ये बदल होऊ शकतो अन्यथा ही सेवा बंद केली जाऊ शकते, असा इशारा भारतीय दूरसंचार निमायक प्राधिकरणाने (टीआरएआय) दिला आहे.विविध आॅफर आणि अमर्यादित डेटा देण्यासाठी सेल्युलर कंपन्यांची आपसात स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ग्राहक आपल्या सोयीने तोच सेल्युलर क्रमांक ठेवून कंपनी बदलतो. त्या एमएनपी सेवेमुळे ग्राहक खूश आहे; मात्र ही सेवा देत असताना दूरसंचार कंपन्या तोट्यात जात आहे. सोबतच ग्राहकांचे सेल नंबर वारंवार बदलले गेले नाही तर कंपन्या तोट्यात येतील. असा अहवालही समोर आला आहे. त्यामुळे एमएनपी सेवा देणे शक्य नसल्याचे मागील वर्षी जुलैमध्ये सेल्युलर कंपनीन टेलीकॉम विभाग (डीओटी) यांना लिखित स्वरूपात कळविले होते. २०१८ मध्ये ८० टक्के दराने पोर्टिंग शुल्क कमी केल्याने आर्थिक फटका सोसावा लागत आहे. दरम्यान, कंपन्यांचे परवाना कालावधी मार्च २०१९ मध्ये संपुष्टात येत असल्याने ही सेवा बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये ३२ दशलक्ष पोर्टेबिलिटी हाताळल्या आहेत. यावरून एमएनपी सेवा घेणारे ग्राहक किती आहे, याचा अंदाज येत आहे. ही सेवा बंद होण्याआधी अनेक संघटना न्यायालयात जाण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान, भारतीय दूरसंचार निमायक प्राधिकरण (टीआरएआय) याप्रकरणी काय पुढाकार घेते, याकडे लाखो सेल्युलर ग्राहकांचे लक्ष लागून आहे. मार्च १९ च्या आत याप्रकरणी महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.