अकोला - सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकार्याने टेबलवर ठेवलेला महागडा मोबाइल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आली नाही; मात्र एका पोलीस अधिकार्याचा ठाण्यातूनच मोबाईल गायब झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सिव्हिल लाइन्स ठाण्यात कार्यरत असलेले एका पोलीस अधिकारी दोन ते तीन दिवसांपूर्वी मोबाइल टेबलवर ठेवून ठाण्याच्या आवारात कामानिमित्त उभे होते. काम आटोपून ते टेबलजवळ गेले असता, मोबाइल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना मोबाइलसंदर्भात विचारणा केली; मात्र सर्व कर्मचार्यांनी मोबाइलसंदर्भात माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर पोलीस अधिकार्याने ठाण्यातच मोबाइल शोधला; परंतु मोबाईल मिळाला नाही. त्यामुळे सदर पोलीस अधिकार्याने मोबाइल गहाळ झाल्याची नोंद पोलीस दप्तरी घेतली. यापूर्वी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील टेबलवरून अशाच प्रकारे एका पोलीस अधिकारी महिलेचा मोबाइल गहाळ झाल्याचा प्रकार घडला होता. शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यातूनच मोबाइल चोरीस जात असल्याने सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चक्क ठाण्यातूनच पोलीस अधिका-याचा मोबाइल लंपास
By admin | Published: January 06, 2016 1:55 AM