आशिष गावंडे
अकाेला: गणेशाेत्सवाच्या निमीत्ताने भाविकांची गर्दी हेरुन त्यांच्या माेबाइलवर हात साफ करणारे झारखंड मधील तीन माेबाइल चाेरटे रविवारी ८ सप्टेंबर राेजी रेल्वे पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून ७ लक्ष ३५ हजार रुपये किंमतीचे महागडे माेबाइल जप्त करण्यात आल्याची माहिती साेमवारी अकाेला रेल्वे पाेलिस स्टेशनच्या प्रभारी सहा.पाेलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी दिली.
कन्हैयाकुमार उमेश रविदास (२४), गब्बर नोनिया मोहार चौधरी (३०) व एक १५वर्षांचा अल्पवयीन मुलगा सर्व रा. साहेबगंज, झारखंड अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. सणासुदीच्या दिवसांत भुरटे चाेर सक्रिय हाेतात. सध्या सर्वत्र गणेश उत्सवानिमीत्त आनंदमयी वातावरण निर्माण झाले आहे. गणरायांचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करतात. ही बाब हेरुन झारखंडमधील माेबाइल चाेरटे अकाेला रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झाल्याची माहिती रेल्वे पाेलिसांना मिळाली हाेती. ८ सप्टेंबर राेजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार रेल्वे स्टेशन परिसरात गस्तीवर असताना कन्हैयाकुमार उमेश रविदास हा रेल्वे स्टेशनवर संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला ताब्यात घेवून पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी करण्याच्या उद्देशातून त्याच्या इतर दाेन साथीदारांसह शहरात दाखल झाल्याची कबुली दिली. यावरुन पाेलिसांनी त्याचा साथीदार गब्बर नोनिया मोहार चौधरी व एक १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा याला ताब्यात घेतले.
यादरम्यान, त्यांच्याकडून ७ लक्ष ३५ हजार रुपये किंमतीचे महागडे १९ माेबाइल जप्त करण्यात आले. ही कारवाइ अकाेला रेल्वे पोलिस स्टेशनच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज ढोके, फाैजदार सतिश चव्हाण, संतोष वडगीरे, सुशिल सांगळे, विजय रेवेकर, इरफान पठाण, कपिल गवई, विजय शेगावकर, तुषार गोंगे यांनी केली. भाड्याच्या खाेलीत वास्तव्य
झारखंडमधील माेबाइल चाेरटे मागील पाच ते सहा दिवसांपासून आपातापा राेडवरील संतकबीर नगर मध्ये भाडेतत्वावर खोली घेवून राहत असल्याचे तपासात समाेर आले. त्यांची कसून चाैकशी केली असता, त्यांनी शहरातील काही भागात तसेच रेल्वे स्टेशन परिसर, बार्शीटाकळी व अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी माेबाइल लंपास केल्याचे सांगितले.माेबाइल हवा;पाेलिसांसाेबत संपर्क साधा
मागील सहा ते सात दिवसांत ज्या नागरिकांच्या माेबाइलची चाेरी झाली, त्यांनी तातडीने रेल्वे पाेलिसांसाेबत संपर्क साधण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे.