आंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेले मोबाइल हॅंग होणे, गरम होणे, बंद पडणे, डिस्प्ले जाणे आदी बिघाड होत असल्यामुळे काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. आयटक संघटनेने वारंवार निवेदने देऊन चांगल्या दर्जाचे मोबाइल द्यावेत, अशी मागणी केली; परंतु शासनाचे याकडे दुर्लक्ष केले. आता कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाइलची मुदत दि. ३१ मार्च २०२१ रोजी वाॅरन्टी संपलेली असून, बिघाड झालेल्या मोबाइलचा दुरुस्ती खर्च चार ते पाच हजार येत आहे. त्यामुळे त्रस्त कर्मचाऱ्यांनी मोबाइल वापसी आंदोलन करीत प्रकल्प कार्यालयाने दिलेला मोबाइल सर्कलनिहाय बालविकास प्रकल्प कार्यालयात जमा केले आहेत. मोबाइल वापसी आंदोलन जिल्हा अध्यक्ष तथा राज्य सचिव सुनीता पाटील यांच्या नेतृत्वात तसेच तालुका अध्यक्षा सरोज मूर्तिजापूरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सुषमा बाजारे, उषा ताडे, वैजयंती ठाकरे, अनिता भटकर, मीरा दही, रूपाली उपाध्ये, जयश्री गावंडे, अलका कराळे, आशा पळस्कार, दुर्गा दाते, मीना दामोदर यांनी परिश्रम घेतले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोबाइल वापसी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:24 AM