अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (ईव्हीएम) अभिरूप मतदानाचे (मॉकपोल) प्रात्यक्षिक शनिवार, ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदाम येथे करण्यात आले.आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेत आवश्यक असलेले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झाले आहेत. ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदाम येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान प्रक्रियेसंदर्भात अभिरूप मतदानाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडचे अभियंते आणि जिल्ह्यातील मान्यता प्राप्त विविध राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ईव्हीएम’द्वारे अभिरूप मतदानाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.