अकोला : बदलते हवामान आणि कृषिउत्पादनावर होणारे त्यांचे दुष्परिणाम यामुळे अन्नसुरक्षेचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून, कृषी संस्था, शास्त्रज्ञांपुढे हे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी कृषीशी निगडित सर्वच पातळ्ीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञांनीसुद्धा ह्यकृषी अर्थह्ण या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. या दृष्टीने महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र परिषदेने येत्या फेब्रुवारीमध्ये दापोली येथे आंतराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे नियोजन केले आहे. या परिषदेत ११ देशांचे अभ्यासक, तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. देशभरात बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अर्थात कोरडवाहू शेतीचे प्रमाण हे ८0 टक्क्य़ांच्या वर आहे. अलीकडच्या काही वर्षांत नैसर्गिक संतुलन बिघडल्याने पावसाची अनिश्चितता वाढली आहे. याला बदलते हवामान कारणीभूत मानले जात असून, याचाच सामना करण्यासाठी या बदलत्या हवामानाला अनुकूल प्रजाती व इतर कृषिजन्य उपाययोजना करण्यावर जगभरात प्रयत्न सुरू आहेत. देशांतर्गत कृषी संस्था, विद्यापीठांनी संशोधन हाती घेतले आहे. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र परिषदेने मागील काही वर्षांपासून कृषी अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित केले असून, परिषदांच्या माध्यमातून अनेक विषय हाताळले जात आहेत. येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिलतील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापाठात आंतराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला भारतातील कृषी अर्थशास्त्रज्ञांसह ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, थायलंड, ब्रिटन, अमेरिकासह ११ देशांतील शास्त्रज्ञ, अभ्यासक सहभागी होणार आहेत. या परिषदेत अर्थपुरवठय़ाचे आधुनिक शेती व फलोत्पादनावर होणारे परिणाम, कृषी तथा फलोत्पादनावरील मूल्यशृखंला विश्लेषण, फलोत्पादन प्रक्रिया व कारखानदारी बळकटीकरण, कृषी निविष्ठा, उद्योग, मत्स्यपालन व प्रक्रिया व्यवसायाचे अर्थकारण यांसह अनेक विषयांवर मंथन होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महेंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रथमच विविध देशांतून २१८ संशोधन पेपर्स परिषदेला प्राप्त झाले असल्याचे सांगीतले. प्रथमच आंतराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषद घेण्यात येत असून कृषीशी निगडित सूक्ष्म बाबी हाताळल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.
आधुनिक शेती, फलोत्पादनावर होणार मंथन!
By admin | Published: November 27, 2015 1:37 AM