अकोला: केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात पारित केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचे आहेत. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी केला.
भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन समारंभाचे फेज बुकवर लाइव्ह प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, बाजारपेठ खुली केल्याने भांडवलदारांचा फायदा होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्तन आणि दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे वर्तन यामध्ये काही फरक आहे काय, असा सवाल करीत दारुडा व्यक्ती घरातील भांडीकुंडी विकतो, तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकार चालवायचे आहे, असे सांगत देशाची संपत्ती विकत आहेत. त्यामुळे मोदी यांचे वागणे दारुड्यासारखेच असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.
चीनसोबत युध्द झाले तर जिंकणार कसे?
नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून, चीनसोबत युध्द झाल्यास जिंकणार कसे, असा सवाल करीत, चीनसोबत लढण्याची आपली कुवत तपासून, त्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर वक्तव्य केले पाहिजे, असा टोला ॲड. आंबेडकर यांनी मोदी सरकारला लगावला.
तीन पायांचे आघाडी सरकार अपयशी!
राज्यात तीन पायांचे आघाडी सरकार सत्तेवर आले असून, हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचे टीकास्त्र ॲड. आंबेडकर यांनी सोडले.
भारतीय बाैध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष् पी.जे. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष निवास्थान परिसरात आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजली आंबेडकर, भन्ते बी. संघपाल, भन्ते बुध्दपालजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, आकाश शिरसाट, मनीषा बोर्डे, पंजाबराव वडाळ, साहील आनंदराज आंबेडकर आदी उपस्थित होते. सामूहिक बौध्द वंदनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे संचालन बौध्द महासभेचे जिल्हा महासचिव प्रा.डाॅ. एम.आर. इंगळे व आभार प्रदर्शन रमेश गवई गुरुजी यांनी केले. सरणंतयने कार्यक्रमाची सुरुवात झाली.