अकोला : भाजप पदाधिकारी, आमदार, खासदारांनी महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकार पुढे आल्यानंतरही प्रधानमंत्री मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया अथवा कारवाईसाठी दखलही घेतली नाही, कोणत्याही घटनेवर अवघ्या दोन मिनिटात टिष्ट्वट करणारे मोदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मौन का राहतात. त्यातून देशातील महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होत आहे, या गंभीर विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी अकोल्यात लक्ष वेधले. जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या मिट द प्रेसमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर मते मांडली.२०१४ मध्ये भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, या घोषणेवर विश्वास ठेवून जनतेने भाजपला सत्ता दिली. प्रत्यक्षात आता होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्याही प्रसारमाध्यमांनी देऊ नये, एवढे दबावतंत्र वापरले जात आहे. राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचाराच्या बातम्या न येण्यासाठी हे तंत्र वापरले जात आहे; मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यातही ज्या चार न्यायाधिशांनी बंड केले होते, त्यापैकी एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यामुळे लोकशाही शाबूत ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. विरोधकांना संपवण्यासाठी कारवाईचा धाक दाखवत भाजपमध्ये सामिल करून घेतले जात आहे. त्यामध्ये एकाचवेळी तीन राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये गेल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.सध्या हुकूमशाही पद्धतीने देशातील अनेक संस्था मोडीत काढण्याचा चंगच भाजप सरकारने बांधला आहे. पुन्हा भाजप सत्तेत आल्यास संवैधानिक व्यवस्थाच मोडीत निघेल. संविधानाच्या अस्तित्त्वावरच घाला घातला जाईल, लोकशाहीचा गळा घोटला जाईल, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीसोबतच सेक्युलर पक्षांशी आघाडीलोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबतच इतर सेक्युलर पक्षांची आघाडीची बोलणी सुरू आहे. आघाडीतील संभाव्य घटक पक्षांना त्यांची मागणी आणि त्यातुलनेत देय जागांची संख्या संबंधितांना कळवण्यात आली आहे. मागणी आणि प्रत्यक्ष जागा याचा ताळमेळ होऊनच आघाडीचा अंतिम निर्णय होणार आहे. भारिप-बमसंचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पक्षपातळीवर चार वेळा चर्चा झाली; मात्र ते काँग्रेसकडून बोलणी झाली नसल्याचे सांगतात, हा त्यांचा विषय आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.