लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शाळेच्या वर्गखोलीत विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला शिक्षक जयंत वावगे याला १५ सप्टेंबर रोजी अकोट येथील न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. स्थानिक पोटे विद्यालयातील कला शिक्षक जयंत वावगे याने पाचव्या वर्गात शिकणार्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात भादंविच्या ३५४ अ, ५0६, पोस्को ८ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्यासमोर पोलिसांनी हजर केले. यावेळी एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी जयंत वावगे याच्याविरुद्ध दाखल असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यात ९ (फ) व १0 या नवीन कलमांची वाढ केली आहे. याप्रकरणी तपासाच्या दृष्टीने १५ सप्टेंबर रोजी विद्यालयात जाऊन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्यासह पथकाने भेट दिली. विद्यालयात घडलेले प्रकरण गंभीर असल्याने यामध्ये शाळा व्यवस्थापनासह इतरांचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले.
विनयभंगप्रकरणात शिक्षकास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 1:21 AM