अकोला: अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसून तिचा विनयभंग केल्या प्रकरणात तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आरोपी बबलू ऊर्फ शंकरसिंह रघुनाथसिंह शेंगर (४९) यास गुरुवारी पाच वर्षांचा सश्रम कारावास व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.मुलीच्या तक्रारीनुसार, १४ एप्रिल २0१५ रोजी तिचे आई-वडील एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. ती घरात एकटी असताना, आरोपी बबलू ऊर्फ शंकरसिंह रघुनाथसिंह शेंगर याने तिला मोबाइलवरील छायाचित्र दाखविण्याचा बहाणा केला आणि जबरदस्तीने घरात घुसला. घरात घुसल्यावर आरोपीने मुलीला जवळ बोलावून तिचा विनयभंग केला. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आरोपी बबलू ऊर्फ शंकरसिंह शेंगर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ४५२, सहकलम ७, ८ बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. नोंदविलेल्या साक्षी व पुराव्यानुसार न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित त्याला पाच वर्षांचा सश्रम कारावास, १0 हजार रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कलम ४५२ नुसार आरोपीला पाच वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ श्याम खोटरे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)