अकोला: अल्पवयीन मुलीस खाऊचे आमिष दाखवून तिला घरात उचलून नेत, विनयभंग केल्याचा आरोप असलेला संदीप अरुण खंडारे (३४) (रा. लाखपुरी, ता. मूर्तिजापूर) याला विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी सोमवारी ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मुलीच्या वडिलांनी १९ फेब्रुवारी २०१६ रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संदीप खंडारे याने अल्पवयीन मुलीस खाऊचे आमिष दाखवून तिला घरात उचलून नेले आणि तिचा विनयभंग केला.
विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात याप्रकरणात सुनावणी झाली. या प्रकरणात सरकारतर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व पुराव्यांचे आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविल्यानंतर आरोपीस भादंवि कलम ३५४ ब मध्ये ७ वर्षं सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद व पोक्सो कायदा कलम ७-८ मध्ये ५ वर्षं सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड, न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली, सर्व शिक्षा आरोपीस एकाचवेळी भोगावयाच्या आहेत. पीएसआय प्रतापसिंह सोळंके यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ज्ञ किरण खोत यांनी बाजू मांडली. हेड कॉन्स्टेबल संजय भारसाकळे व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी म्हणून साह्य केले.
साक्षीदार फितूर झाल्याने, कारवाईचे आदेश
मुलीच्या विनयभंग प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार असलेला प्रभुदास ढोरे हा न्यायालयात फितूर झाला. त्याने भादंवि कलम १९१ नुसार खोटी साक्ष दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.