अकोला: शिकवणी वर्गाला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून, विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलावून तसेच तिच्यासोबत अश्लील संवाद साधून तिला घरून पळून जाण्यासाठी परावृत्त करून विनयभंग करणाऱ्या वृद्धास न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, ती शिकवणी वर्गाला जात असताना आरोपी बाळकृष्ण राजेंद्र झिंगे (७५) हा तिचा पाठलाग करायचा. तिला शिकवणी वर्गाच्या बाहेर बोलावून अश्लील संवाद साधायचा, तसेच तिला घरून पळून जाण्यासाठी दबाव टाकायचा. हा प्रकार सहन न झाल्यामुळे विद्यार्थिनीने मित्राला माहिती दिली. मित्राने त्या वृद्धाला पकडून खदान पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी १८ आॅगस्ट २0१३ रोजी वृद्ध बाळकृष्ण झिंगे या वृद्धाविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३५४ (अ), पोस्कोनुसार गुन्हा दाखल करून वृद्धास अटक केली. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. आरोपीविरुद्ध साक्ष व पुराव्याच्या आधारे न्यायालयाने त्याला दोन वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी विधिज्ञ आशिष फुंडकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)