लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेक शाळकरी मुले घरी आहेत. कुटुंबातील सदस्य मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करतात का, याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता पालक बाहेर जाताना मास्क वापरत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. जे पालक मास्क व कोविड-१९ च्या इतर नियमांचे उल्लंघन करतात त्यांना मास्क वापरण्याबाबत ही मुले आठवण करून देत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. जिल्ह्यात शुक्रवार, सकाळपर्यंत कोरोना बाधितांची संख्या तब्बल १५ हजार २५५ वर पोहोचली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत ३६२ मृत्यू झाले आहेत. तसेच ११ हजार ८४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असले, तरी सर्वसामान्यांना लस मिळण्यासाठी मोठा विलंब होणार आहे. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, हात धुणे याचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून होत आहे. तरीही काही नागरिक विनामास्क वावरत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अनलॉक प्रक्रियेत शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शाळा बंद करण्यात आल्या. याबाबत चिमुकल्यांशी संवाद साधला असता घरातील सदस्य याबाबत चर्चा करीत असल्याने आम्हाला या उपाययोजनांची माहिती झाली. त्यामुळे बाहेर जाताना आम्ही मास्क घालतो, घरी आल्यानंतर हात धुतो. कोणी याकडे दुर्लक्ष करीत असेल, तर त्यांनाही सूचनांची आठवण करून देतो, असे मुलांनी सांगितले.
बॉक्स...................
स्वत:ची काळजी घ्या आणि आईबाबांचीही काळजी घ्या!
- प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडिलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
- आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? सॅनिटायझर वापरले का, हेदेखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.