तालुक्यातील आडसुल - तेल्हारा - हिवरखेड व वरवट, तेल्हारा - वणी वारुळा या मुख्य रस्त्यांच्या कामाचा मुहूर्त काही दिवसांपूर्वी निघाला होता. मात्र, पहिला कंत्राटदार हा काम करण्यास सक्षम नसल्याने आणि त्याच्याकडे असलेली थकीत रक्कम मिळाली नाही. त्यामुळे काम थांबले. रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कंत्राटदारांनी दुसऱ्या एजन्सीला रस्त्याचे काम सुरू करण्यास विरोध केला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्यस्थी करून त्यावर तोडगा काढला असून, लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून चारही बाजूंचे कंत्राटदाराने केवळ रस्ते खोदून ठेवले आहे. मात्र, प्रत्यक्षात एक मीटर रस्ता पूर्ण केला नसून, गेल्या दोन वर्षांपासून जनतेचे हाल होत आहेत. अनेक नागरिकांचे अपघात झाले असून, काही नागरिकांचा रस्त्यामुळे बळी गेला आहे. पावसाळ्यात अनेक वाहने चिखलामध्ये फसत असून, घसरून पडत आहेत. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.
यामुळे रस्त्याची लागली वाट
ज्या कंत्राटदाराने हा कंत्राट घेतला. त्या कंत्राटदाराचा नियोजनशून्य कारभार व अनुभवाचा अभाव तसेच आर्थिक दृष्टीने सक्षम नसल्याने पूर्ण रस्त्याची वाट लागली. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी अनेकदा बैठका घेऊन मार्ग काढला. परंतु कामाची मुदत संपत असताना, चार रस्ते तर सोडा पण एक किलोमीटरही रस्ता सुधीर कन्स्ट्रक्शन कंपनीने पूर्ण केला नाही. त्यामुळे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने कामात दिरंगाईमुळे दंड केला होता. यावर तोडगा काढत, बैठक घेऊन काम त्याच कंपनीच्या नावावर दुसरी कंपनी काम करेल, असे ठरले. ज्या राजलक्ष्मी कंपनीने कामाचा मुहूर्त काढला. मात्र, ज्या पहिल्या कंत्राटदाराने काम केले. त्या कंत्राटदाराची थकीत रक्कम बाकी असल्याने, त्यांनी दुसऱ्या कंपनीला काम सुरू करण्यास विरोध केला. त्यामुळे रस्ता कामास विलंब होत आहे.
लवकरच होणार कामाला सुरूवात
लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्याची रक्कम थकीत आहे. त्यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांची रक्कम त्यांना दिली जाईल, याची हमी घेतली. त्यामुळे आता काही दिवसांतच काम सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सरनायक यांनी दिली.