अकोला : यंदा पहिल्यांदाच सोयाबीनला ११ हजार ५०० रुपयांचा विक्रमी दर मिळाल्याने शेतकरी आनंदी आहे; परंतु हा दर केवळ मुहूर्ताचे असून, प्रत्यक्षात सोयाबीनला साडेपाच ते सात हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळत असल्याचे निदर्शनास आले. बाजार समितीत येणाऱ्या सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणे कठीण झाले आहे. मागील खरिपात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे बाजारात अपेक्षित आवक झाली नाही. परिणामी, सोयाबीनच्या दरांनी उच्चांक गाठला; मात्र जवळ सोयाबीन नसल्याने या दरांचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकला नाही. सोयाबीनला चांगले दर मिळाल्याने यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली. सुरुवातीला पेरणी झालेल्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. नवीन सोयाबीनची बाजार समितीत आवकही सुरू झाली आहे. नवीन सोयाबीनला मुहूर्ताला सर्वाधिक ११ हजार ५०१ रुपये दर मिळाला; परंतु म्हणतात ना, ‘हत्तीचे दात दाखविण्याचे वेगळे व चावण्याचे वेगळे’ त्याचप्रमाणे ही खरेदी झाली. सद्यस्थितीत ओलावा कमी असलेल्या सोयाबीनला ७ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे. हे दर किती दिवस टिकून राहतील, याबाबत श्वाश्वती नाही.
मालात २० ते ४० टक्के आर्द्रता
यंदा सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याच्या अपेक्षेने शेतकरी माल विक्रीस आणत आहे; परंतु जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे ओलेच सोयाबीन विक्रीसाठी आणावे लागत आहे. यामध्ये २० ते ४० टक्के आर्द्रता आढळून येत असल्याचे अडत्यांनी सांगितले.
ऑक्टोबरमध्ये ५ ते ६ हजार रुपये दर
सध्या बाजार समितीत येणाऱ्या सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे, तरीही दरात तेजी, ओलावा कमी असलेल्या सोयाबीनला सात हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत दर मिळत आहे; मात्र ऑक्टोबरमध्ये सोयाबीनची आवक वाढल्यानंतर हेच दर ५ ते ६ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत येण्याची शक्यता असल्याचे अडत्यांनी सांगितले.
प्लांटला हवे आर्द्रतेचे प्रमाण कमी
अकोला शहरातील बाजार समितीसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील बाजार समितीतून तेल निर्माण करणारे प्लांट सोयाबीनची खरेदी करतात. या प्लांटला सोयाबीनमध्ये १२ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान आर्द्रता असणे अपेक्षित आहे. त्याच वेळेस ते सोयाबीनची खरेदी सुरू करणार असल्याचीही माहिती आहे.
अडत दुकानदार म्हणतात...
बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सध्या सोयाबीनमध्ये आर्द्रता पाहून साडेपाच ते सात हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. २० तारखेनंतर दरात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.
- महेश हुसे
सर्वाधिक आर्द्रता असलेल्या सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत भाव मिळाला. पाऊस थांबल्यास येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनची आवक वाढणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चांगला दर आहे.
- पुखराज पेढीवाल