अकाेला : डाबकी राेडवरील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एटीएमचे क्लाेनींग करून हजाराेंची राेकड पळविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. स्टेट बँकेच्या या एटीएममधून सात ते आठ ग्राहकांचे पैसे पळविण्यात आले असून, याेग्य त्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि अलार्म नसल्याने या एटीएम सेंटरमधून चाेरटे ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लाेनींग करून पैसे पळवीत असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले आहे.
डाबकी राेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीत स्टेट बँकेचे एटीएम असून, या एटीएम सेंटरमध्ये याेग्य त्या प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज लावण्यात आलेले नाहीत. यासाेबतच अलार्मही नसल्याने या एटीएममध्ये येणाऱ्या ग्राहकांचे एटीएम क्लाेनींग करून त्यांचे पैसे पळवण्यात येत असल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणाच्या तक्रारी पाेलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर पाेलिसांनी चाैकशी करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, या एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समाेर आले. त्यामुळे ग्राहकांकडून पैसे उकळणाऱ्या बँकेने एटीएम सेंटर देताना त्याची सुरक्षाही याेग्य ती करावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या ग्राहकांनी केली आहे. पैसे पळविल्यानंतर अलार्म न वाजल्यामुळे या एकाच एटीएम सेंटरमधून गत १५ दिवसांच्या कालावधीत सुमारे ७ ते ८ ग्राहकांचे पैसे पळविल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणाच्या तक्रारी पाेलीस ठाण्यात झाल्यानंतर पाेलिसांनी बँकेची निष्काळजी हाेत असल्याचे स्पष्ट केले; मात्र त्यानंतरही बँक प्रशासन काहीही काळजी घेत नसल्याने ग्राहकांचे पैसे पळविण्यात येत आहेत.
बँकेने ठेवावी सुरक्षा
एटीएम सेंटरच्या ठिकाणी बँकेनेच सुरक्षा व्यवस्था ठेवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. एवढेच नव्हे तर पाेलिसांनीही तशा सूचना बँकांना दिल्या आहेत; मात्र तरीही बँक निष्काळजी करीत असल्याने ग्राहकांना लाखाेंचा फटका बसत आहे. याकडे बँक प्रशासनाने तातडीने ताेडगा काढावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.