मान्सून दरवर्षी भारत भेटीला येत असला तरी त्याचा प्रसार आणि मार्गक्रमण इतर देशाचे वातावरण नियंत्रित करीत असतात. बुधवारी बऱ्याच अवधीनंतर खांदेश, विदर्भ आणि मराठवाडा विभागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसून आली. बंगालच्या उपसागरावर सक्रिय प्रणालीचा जोर ओसरत आहे, ही मान्सूनच्या सामान्य प्रगतीकरिता सकारात्मक परिस्थिती आहे.
जमिनीवरील आर्द्रता ५० टक्क्याच्या आसपास आहे. जमिनीपासून दीड-तीन किलोमीटरपर्यंत तेच प्रमाण ८० टक्के अधिक आहे, ही स्थिती सर्वदूर पाऊस बरसण्याकरिता पूरक आहे. तापमान २८ ते ३३ डिग्री सेल्सिअसदरम्यान आहे. बुधवारपासून विदर्भात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पुढील २-३ दिवस ही परिस्थिती सक्रिय राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सायंकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या होत्या.
पुरेसा पाऊस म्हणजेच १०० मिमी बरसला. जमिनीत ओल १५-२० सेंटीमीटर आहे. ही खात्री करून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक पेरणी करणे फायदेशीर ठरते. पुढील काही दिवस पावसाचे राहण्याचा अंदाज आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक